Responsive image

मनोगत

श्री. गुलाबराव सदाशिव पाटील (सैंदाणे)

सन्माननीय आजीव सभासद बंधू व भगिनींना आदरपूर्वक नमस्कार. आपल्या मंडळाची स्थापना होवून ३६ वर्षे झाली आहेत. आम्ही सर्व कार्यकर्ते, कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य व सल्लागार मंडळाच्या आजपर्यंतच्या जडणघडणीत तन मन धनाने काम करत, मंडळाचा नाव लौकिक केवळ पिंपरी चिंचवड, पुणे परिसरात, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार मध्येच नाही तर खान्देशच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्येही वाढविला आहे. सुरुवातीच्या काळात तर सर्वजण झपाटल्यासारखे मंडळासाठी स्वतःचे व्यासपीठ तयार करण्यासाठी इमारत निधी देणग्या मिळविण्यासाठी, आजीव सभासद वाढविण्यासाठी स्वत:च्या घरदाराकडे पुरेसे लक्ष न देता हातात झोळी घेवून आपल्याकडे याचना करत होतो. खूप पाठपुरावा करुन नवनगर विकास प्राधिकरण, निगडी, पुणे येथे त्यावेळच्या प्राधिकरणाच्या अध्यक्ष, सीईओ साहेबाच्या सहकार्यामुळे प्रथम एक प्लॉट खरेदी करुन सध्याचे सभागृह बांधले व पुढे पाच वर्षांनी शेजारचा ही प्लॉट खरेदी केला हे आपणास माहितच आहे. या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ काळात मंडळाच्या सर्वच अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले व मंडळाचा नावलौकिक वाढविला आहे. आपणास माहितच आहे की, मी १२ जुलै २०२० रोजी अध्यक्ष म्हणून कार्यभार स्विकारला. त्यानंतर माझ्या सहकाऱ्यासह व सल्लागार मंडळाच्या मार्गदर्शनाप्रमाणे आजपर्यत काम करत आहे. आम्ही २६ जानेवारी २०२० रोजी मंडळाच्या आजीव सभासदांचा सहकुटुंब स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यावेळी गुणवंत विद्यार्थी, खान्देशच्या गुणवंत व्यक्तींचा गौरवचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. त्यावेळी सर्वश्री शितलकुमार रवंदळे व माणिकराव पाटील यांना "खान्देश भूषण" पुरस्कार देवून गौरव केला. त्यानंतर मार्च २०२० पासून कोविड या जीवघेण्या आजाराचा जवळजवळ २ वर्षे देशभर धुमाकूळ सुरु होता. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर सरकारची बंधने आल्यामुळे आम्ही समाजोपयोगी कार्यक्रम घेवू शकलो नाही. अशाही परिस्थितीत मी स्वतः अंध, अपंग, अनाथ गरजवंतांना अन्नधान्याचे एकहजार ते अकराशे रुपयांचे कीट कोविड योध्यांच्या मदतीने वाटप केले. याशिवाय वाल्हेकरवाडी मध्ये चिंतामणी मंदिराजवळ १ मे २०२० रोजी ४०० ते ५०० गरजवंतांना गहू ५ किलो, तांदूळ ३ किलो असे वाटप केले. नागरिकांना चांगल्या प्रतिच्या मास्कचे वाटप केले. कोविड काळात नाकाबंदी, बंदोबस्त करणाऱ्या पोलिस बंधूना जवळजवळ दोन महिने आपल्या मंडळाचा हॉल विना | मोबदला वापरण्यास, रहाण्यास दिला. आपण या काळात कॉम्प्युटरवर ऑनलाईन नोंदणीचे ९०% काम पूर्ण केले असून इन्कमटॅक्स खात्याकडून "१२ए" व ८०जी" हे सर्टिफिकेट प्राप्त केले आहे. " कोविडची बंधने थोडी शिथील झाल्यावर दि. २४/१०/२०२१ रोजी कोविडकाळात जीवाची पर्वा न करता समाजासाठी काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, समाजसेवक अशा २८ महिला व पुरुषांना पिंपरी चिंचवडचे आयुक्त मा. श्री. राजेश पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्हे, पुष्पगुच्छ देवून सन्मानित केले आहे.